नांदेड येथे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेत आहेत. या ठिकाणचे पोलिस सतर्क झाल्यामुळे नांदेड येथील दरोडेखोरांनी शेजारील जिल्हे टार्गेट केले आहेत. दरम्यान, शहरातील इंदेवाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले पाच जण एका झाडाखाली बसले होते. साध्या वेशात चारही बाजूंनी आलेले पोलिस पाहताच सर्वच जण पळू लागले. दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पाच आरोपी शुक्रवारी जेरबंद केले. एक जण दुचाकी घेऊन पसार झाला आहे.
सत्करनगर, राजपूतवाडी व विभावरी ताकट यांच्या घरी झालेल्या तीन घरफोड्यांमुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या गु्न्ह्यांतील आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान नांदेड येथील काही दरोडेखोर जालना येथे आल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पाच दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले आहे. राजूसिंग मायासिंग बावरी (२६, रा. गुरू गोविंदसिंगनगर, उमरी, जि. नांदेड), लक्ष्मणसिंग ठाकूरसिंग बावरी (२६. रा. हनुमान गल्ली, उमरी, जि. नांदेड), प्रेमसिंग धरिमसंग खिच्ची (२५, रा. हनुमान गल्ली, बकरी बाजार, उमरी, जि. नांदेड), मेहमूद मौलासाब शेख (२६, रा. इस्लामपुरा, उमरी, जि. नांदेड), बालाजी तोलबा गुंटे (२४, रा. गोरठा, ता. उमरी, जि. नांदेड) अशी संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. इंदेवाडी परिसरात ५ ते ६ व्यक्ती जमल्या असून, त्या दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथक इंदेवाडी परिसरात पोहोचले. तेथे काही जण पाझर तलावाच्या बाजूला एका झाडाखाली बसलेले दिसले. त्यातील एकाला पोलिस आल्याचे कळताच, तो दुचाकीवरून फरार झाला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सर्व संशयित आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक आर. रागसुधा, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय प्रमोद बोंडले, अंमलदार गोकुळसिंग कायटे, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, विनोद गडदे, रुस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, किशोर पुंगळे, रवी जाधव आदींनी केली.
एक जण दुचाकी घेऊन पसार, पोलिसांना पाहताच अाराेपींनी काढला हाेता पळ
आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले दरोड्याचे साहित्य.
मिरची पावडर, दांडे, मास्टर की जप्त
जेरबंद करण्यात आलेल्या दरोडेखोरांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून मिरची पावडर, दांडे, मास्टर की, खंजीर, चेहरा लपविण्याचे मास्क, हँड ग्लोव्हज् व इतर वस्तू असा एकूण ४१ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.








