पैठण / स्वाती वाघ
राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या सक्रिय बांधकाम कामगारांच्या इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन पाल्यांना २२ प्रकारच्या एकूण ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफत देण्यात येणार आहे. यासंदर्भात ३० ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.मंडळाच्या ११ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर कामगार विभागाने योजनेला प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपात मदत दिली जात होती. मात्र, आता विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक व अभ्यासोपयोगी साहित्य थेट वस्तूंच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे.सक्रिय नोंदणी असणे आवश्यकया योजनेचा लाभ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि सध्या सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांनाच मिळणार आहे. संबंधित कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांनी इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.शैक्षणिक संचात २२ प्रकारच्या वस्तूशासन निर्णयानुसार या शैक्षणिक संचामध्ये पाण्याची बाटली, गरम व थंड पाणी ठेवण्यासाठी थर्मास, टिफिन बॉक्स, छत्री, रेनकोट, परीक्षा पॅड, १८ वह्या, ड्रॉईंग बुक, बॉलपेन बॉक्स, दोन पेन्सिल बॉक्स, भूमिती कंपास, ऑईल पेस्टल, पोस्टर कलर, ब्रश संच, प्लास्टिक पट्ट्या, सोलर लॅम्प, कॅल्क्युलेटर, फोल्डिंग अभ्यास टेबल, दोन मार्करसह व्हाईट बोर्ड, गजराचे घड्याळ, शाळेची बॅग आणि किट बॅग अशा साहित्याचा समावेश आहे.या संचातील सोलर लॅम्प, फोल्डिंग अभ्यास टेबल आणि व्हाईट बोर्ड यांसारख्या वस्तूंमुळे विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी विशेष सुविधा उपलब्ध होणार आहे.उपकर निधीतून खर्चया योजनेसाठी येणारा संपूर्ण खर्च मंडळाकडे जमा असलेल्या उपकर (Labour Cess) निधीतून करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळावा, हा या योजनेचा उद्देश आहे.नोंदणी नूतनीकरण करण्याचे आवाहन जिल्ह्यासह राज्यातील अनेक बांधकाम कामगारांच्या नोंदणीची मुदत संपलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंदणी सक्रिय असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या कामगारांनी अद्याप नोंदणीचे नूतनीकरण केलेले नाही, त्यांनी संबंधित अधिकृत यंत्रणेमार्फत तातडीने नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.








