हिंगोली : (इसाक पठाण)
येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात व्हॉईस ऑफ मीडियाचा पदग्रहण सोहळा, विमा पॉलिस वाटप व कार्यशाळा घेण्यात आली. यात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात चर्चा करण्यात आली.
अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार तानाजी मुटकुळे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, माजी खासदार ॲड. शिवाजी माने, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार रामराव वडकुते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनायक भिसे, संदेश देशमुख, जि.प.चे माजी उपाध्यक्ष मानेज आखरे भाजपाचे रामदास पाटील सुमठाणकर, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र वाढे, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मराठवडा अध्यक्ष विजय चोरडीया, छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव पाटील जरोडकर, जि.प.चे डेप्युटी सीईओ कुंभारकर, ज्येष्ठ पत्रकार विजय निलावार, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी पोलिस बँड पथकाच्या संचाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत
केले. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी संघटनेत सहभागी झालेल्या पत्रकारांना पदग्रहणाची शपथ दिली. यावेळी मान्यवरांना प्रमाणपत्रचे वाटपही करण्यात आले. तसेच पत्रकार तथा फोटोग्राफर विजय गुंडेवार यांच्या वेदनांचे काहूर या कविता संग्रहाचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते झाले. संघटनेचे अध्यक्ष रमेश कदम यांनी प्रास्ताविक केले. कवयित्री प्रा. संध्या रंगारी यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेचे सरचिटणीस रमेश चेंडके यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाभरातील जवळपास २०० पत्रकार उपस्थित होते.
जिल्ह्यातील पत्रकारांची पहिली गृहनिर्माण संस्था
जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून पत्रकारांना घरे उपलब्ध व्हावीत, या अनुषंगाने गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आली आहे. यापुढे तालुकास्तरावर गृहनिर्माण संस्था स्थापन करून निवाऱ्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार भाऊ पाटील, माजी खासदार शिवाजी माने, भाजपाचे रामदास पाटील, संदेश देशमुख, रविंद्र वाढे आदींनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.
धगधगती आग तेवत ठेवा-संदीप काळे
दुसऱ्या सत्रात संघटनेत सहभागी पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. पत्रकारांनी सकारात्मक लिखान केले पाहिजे. आपल्या लेखनीतून आपली ओळख निर्माण होते. चारित्र्य निर्मळ असले पाहिजे असा सल्ला देत पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या पत्रकांरांच्याही वेदना जाणून घेण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा. देशभरात वाढत चालेली संघटनेची ही आग अशीच धगधगती ठेवावी, असे आवाहनही संस्थापक अध्यक्ष काळे यांनी केले.









