नांदेड (इसाक पठाण )
नांदेड येथील शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयात 48 तासात 35 जणांचा मृत्यू झाला असून यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे या मृत्यूकांडामुळे सबंध राज्यात खळबळ माजली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नांदेड येथील सरकारी रुग्णालयात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व औषधांच्या तुटवड्यामुळे 48 तासात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे या गंभीर प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून रुग्णांच्या नातेवाईकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदेडच्या सरकारी रुग्णालयात परभणी हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील गरीब रुग्ण औषध उपचार करण्यासाठी येतात कोणताही आजार असो किंवा अपघात रुग्णांना सरळ नांदेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येते सर्व आरोग्य सोयीसुविधा असल्यामुळे इतर ठिकाणाहून या रुग्णालयात रुग्णांना रेफर करण्यात येत होते पूर्वी या रुग्णालयात उत्तम सेवा दिली जात असे परंतु कालांतराने आरोग्य सेवेस मरगळ आली स्टाफची कमतरता औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ लागले अशातच गेल्या 48 तासात या रुग्णालयात ऍडमिट असलेल्या 35 रुग्णांचे मृत्यू झाले असून यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे
तर काही रुग्ण गंभीर आहेत 35 रुग्णांचा अचानक मृत्यू झाल्याने सबंध राज्यात एकच खळबळ माजली असून आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ ,नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हिंगोली चे खासदार हेमंत पाटील आदींनी तात्काळ रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली तसेच आवश्यक सूचना दिल्या व सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले या मृत्यूकांडाची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत
दरम्यान हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी संताप व्यक्त करीत रुग्णालयाचे डीन यांना स्वच्छतागृह स्वच्छ करायला लावले या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे









