अतुल महळणकर
बुलढाणा : शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी शासनाने ३० जून २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. मात्र, नंबर प्लेट बसवण्यासाठी नोंदणी करणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने परिवहन आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. या मुदतीनंतर एचएसआरपी नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांची आरटीओतील कोणतीही कामे करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सुमारे २ लाख ९० हजार जुनी वाहने आहेत, ज्यांना एचएसआरपी बसवणे आवश्यक आहे; मात्र आतापर्यंत केवळ २० हजार ४७५ वाहनधारकांनीच यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी अंतिम मुदतीपूर्वी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
एचएसआरपी’साठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया
एचएसआरपी बसवण्यासाठी वाहनधारकांनी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या
https://transport.maharashtra.g ov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर वाहनधारकांना आपल्या सोयीच्या फिटमेंट सेंटर आणि वेळेची निवड करता येते, तसेच ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.
२० केंद्रे
जिल्ह्यात २० फिटमेंट सेंटर कार्यरत असून, अर्जात जवळील सेंटर निवडता येते. काही पुरवठादार घरी येऊन एचएसआरपी बसवण्याची सेवा देतात. अर्ज करताना हा पर्यायही निवडता येतो. अर्जदारांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
“जिल्ह्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनधारकांनी कोणताही विलंब न करता त्वरित ऑनलाइन अर्ज सादर करावा. आणि ३० जून २०२५ पूर्वी आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसवून घेऊन भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळावी,”
-ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
कोणती कामे थांबणार?
आरटीओकडून परवाना, वाहन नोंदणी, पत्ता बदल, परवाना नूतनीकरण यांसारख्या सेवा दिल्या जातात. मात्र, ज्यांच्याकडे १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहन आहे आणि त्यांनी एचएसआरपी बसवलेली नाही, त्यांच्या या सेवा थांबवण्यात येणार आहेत. तथापि, ज्या वाहनधारकांनी आधीच ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यांची अडवणूक होणार नाही, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
नियमभंग झाला, तर…
अनेक वाहनधारकांनी अद्याप एचएसआरपी बसवण्याकडे दुर्लक्ष केले आहे; मात्र ३० जून २०२५ नंतर नियम मोडल्यास परिवहन विभाग दंडात्मक कारवाई करणार आहे. या कारवाईत मोठ्या दंडाची शक्यता असून, वारंवार नियम मोडल्यास वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द होऊ शकते. त्यामुळे ही मुदत गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.







