मुंबई :
शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. एका दुर्दैवी अपघातात त्यांचा दुर्दैवी निधन झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा आज पहाटे 5:30 वाजता भाताण बोगद्याजवळ अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पनवेलच्या येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत होता. यामध्ये त्यांचा मुलगाही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी शिवसंग्राम हा स्वतःचा पक्ष काढला होता.
विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.
विनायक मेटे यांच्या कारला एका मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. “आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकने कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात 5 वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास 6 वाजता रुग्णवाहिका आली”, अशी माहिती विनायक मेटेंचा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी दिली.









