देऊळगाव राजा / अतुल महाळनकर
येथील तिरुपतीचे प्रतिरूप असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात यावर्षी भक्तांची मांदियाळी
पाहावयास मिळाली . मध्यरात्रीनंतर पालखीत विराजमान झालेले श्री बालाजी सीमोल्लंघनासाठी निघाले व सुमारे २० तास हा पालखी सोहळा रंगला . ५२ थांब्यांवर श्रींच्या मूर्तीला स्पर्श करीत भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला . ३३० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या सोहळ्यात श्रींची मूर्ती विराजमान झालेली पालखी सोहळा ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर लक्ष्मी रमण गोविंदा व श्री बालाजी महाराज की जय या जयघोषामध्ये मंदिराबाहेर निघाली तत्पूर्वी पुजारीवृंद व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी सपत्नीक श्रींची महाआरती केली . वर्षाभरातून एकदाच श्री बालाजी महाराजांच्या मूर्तीला चरणस्पर्श करून दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना होतो . पालखी सोहळा झाल्यानंतर श्री बालाजी महाराज मंदिरातील सिंहासनावर विराजमान होतात . त्यावेळेस विशिष्ट अंतरावरून भाविकांना श्रींचे दर्शन घेता येते , हे या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य आहे . सर्व जाती धर्मातील भाविकांना सर्व सोहळ्यादरम्यान दर्शनाचा विशेष मान दिला जातो . मंदिरातून निघाल्यानंतर पालखी सोहळा माळीपुरा येथील रस्त्यावरून थेट आमना नदीपात्रातील असलेल्या चौथऱ्यावर पालखी विराजमान झाली . काही वेळ चाललेल्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर पालखी शहरातील आमना नदी तीरावरून श्री धोंडीराम महाराजांच्या मठाजवळून सावखेड भोई वेस मार्गक्रमण केले जुनी कमिटी चौक अहिंसा मार्ग त्यानंतर वेशीजवळून मंदिराकडे मार्गक्रमण झाले . त्यावेळी विविध थांब्यावर भक्तांना दर्शन देण्यासाठी पालखी सोहळा थांबवण्यात आला . त्यानंतर मंदिरासमोर आल्यानंतर अभिषेक करून परत श्री बालाजी महाराजांची मूर्ती सिंहासनावर आरुढ करण्यात आली . जिल्हा भरातील भाविकांनी देऊळगावराजा येथिल श्री बालाजी महाराजांच्या पालखीमध्ये सहभाग घेतला होता .









