अतुल महाळणकर
सिंदखेडराजा : राजे लखुजीराव जाधव समाधी परिसरात उत्खननात सापडलेली विष्णू शेषशायी मूर्तीही साधारणतः ११ व्या शतकातील असण्याची शक्यता आहे. या मुर्तीची लांबी १.७ मिटर असून उंची साधारणतः १ मीटर असवी, ही मूर्ती सापडल्याने सिंदखेड राजाच्या पुरातन इतिहासावर प्रकाश पडण्यास मदत मिळणार आहे.
राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून गेल्या सुमारे महिनाभरापासून उत्खनन सुरु आहे. समाधी परिसराची दुरुस्ती व्हावी, यासाठी सदरचे उत्खनन सुरू आहे. त्यासाठी एक पथक सिंदखेडराजा येथे कार्यरत आहे
उत्खननामध्ये बुधवार, १९ जून रोजी शेषनागावरील विश्राम अवस्थेतील भगवान श्री विष्णु यांची मूर्ती असल्याचे आढळून आले. यापूर्वीही गेल्या महिन्यात याच परिसरात शिवलिंग आढळून आले होते. संपूर्ण खोदकाम झाल्यानंतर शिव मंदिराचा गाभा असल्याचे दिसून आले
उत्खननात सापडलेली मूर्ती नागपूर येथे हलविण्याचे सांगितले गेल्याने स्थानिकांनी सदर मूर्ती नागपूरला न नेता सिंदखेडराजा येथेच जतन करून भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी रेटली आहे. मूर्ती बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे.








