केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे
जालना / तुकाराम राठोड
राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही, राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नाही. क्षणिक काही गोष्टी घडतात आणि त्यातून मतभेद वाढत असतात. असे प्रतिपादन जेष्ठ भाजप नेते व केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. दिल्ली येथे पत्रकार बांधवांशी ते बोलत होते.
पुढे बोलतांना श्री दानवे म्हणाले की “मी आणि अर्जुनराव खोतकर यांनी राज्यामध्ये आमचं सरकार नसताना सुद्धा 25 वर्ष जिल्हा परिषद आम्ही ताब्यात ठेवली. डीसीसी बँक आम्ही ताब्यात ठेवली आणि शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारने जालना जिल्ह्यावर वर्चस्व ठेवलेले आहे. आजही खोतकरांनी आता उल्लेख केला की ते शिवसेनेत आहेत ही गोष्ट खरी आहे की ते शिवसेनेतच आहेत आणि आजही राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. आमची नुकतीच शिंदे साहेबाकडे भेट झाली, भेटीमध्ये आमची चर्चा झाली आणि त्यांना मी “या चहा घ्यायला असं निमंत्रण दिलं होतं.” आज त्या निमंत्रणाप्रमाणे आमचे मित्र सुरेश नवले व ते आज माझ्याकडे आले. ते आमचे जुने मित्र आहेत. मी, सुरेश नवले, अर्जुन खोतकर मित्रत्वाच्या नात्याने चहा पानाला आले. आम्ही एकत्र विधानसभेत आमदार होतो, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला 2019 च्या निवडणूकीत जनतेने पुर्ण बहुमत दिलं होतं. ही तिच शिवसेना आहे जी आमच्या सोबत आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचेच नेते होते, दैवत होते. आम्ही सर्वजण त्यांना मानत होतो. राजा होते ते या महाराष्ट्राचे पण आता राजाच्या पोटी जन्माला आलेला राजा नाही होऊ शकत. राजा मतपेटीतून जन्माला येतो. आता राजा पोटातून जन्माला येत नाही. असे शेवटी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी शेवटी सांगितले.








