प्रतिनिधी | बदनापूर
वाहन चोर अनेक युक्त्या करून वाहनांची सहजपने चोरी करतात, चोरलेल्या वाहनांचे नंबर बदलून वाहने विक्री करणे असे प्रकार घडत असतांना एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल एकाच वेळी एकाच ठिकाणी दिसून आल्याने बघणाऱ्यांना आश्चर्य वाटले आणि दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असली तरी वाहन ज्याच्या ताब्यातून मिळाले त्याला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
बदनापूर शहरासह तालुक्यात मागील दोन वर्षात प्रचंड गुन्हेगारी वाढली असून दिवसा चोऱ्याच्या घटनासह खून, मारामारी आदी गुन्हे घडत आहे मात्र पोलीस प्रशासनाचा कोणताही वचक गुन्हेगारांवर राहिलेला दिसत नाही, मागील दोन महिण्यात खून, चोऱ्या, मारामारी आदी घटना घडत आहे, एकंदरीत काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अवैध व्यवसाय करणाऱ्या मंडळी सोबत आर्थिक लागेबाधे असल्याने या व्यवसायिकांचे मनोधैर्य वाढलेले असून या मधूनच गुन्हेगारी वाढत असल्याचे जाणकरांचे मत आहे.
चोरटे चोऱ्या करण्यासाठी तोंडावर मास्क, रुमाल बांधून सी सी टी व्ही ला चॅलेंज करतात व दिवसा चोऱ्या करतात परंतु त्यांना पोलीस पकडून आणण्यात असमर्थ ठरत आहे, चोर विविध युक्त्या करून आपलं चोरीचा व्यवसाय बिनधास्त करत असतांना चोरलेले वाहन विक्री करण्यासाठी नंबर बदलले जातात मात्र दोन मोटारसायकल वर एकच नंबर असल्याची घटना आश्चर्यकारक बदनापूर शहरात बघावयास मिळाली असून एम एच 21 बी टी 8026 असे क्रमांक असलेल्या दोन मोटारसायकल एका मटणाच्या दुकानासमोर दिसून आल्याने बघणारे आवाक झाले व चर्चा सुरु झाल्याने दोन्ही मोटारसायकल वाहतूक पोलीस जमादार किसन जाधव यांनी ताब्यत घेऊन पोलीस ठाण्यात आणून लावले मात्र ज्यांच्या ताब्यात ह्या गाड्या होत्या ते दोघे उडवाडवीची उत्तरे देऊन निघून गेले, त्या दोन्ही व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस करणे आवश्यक होते त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
एकच नंबर दोन मोटारसायकल वर टाकण्याचा उद्देश काय?, सदरच्या मोटारसायकल कोणाच्या नावावर आहे? सदरील वाहने चोरीची आहे का? एखादी टोळी सक्रिय आहे का असे विविध प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता असून दोन वाहनवरील नंबर प्रकरणी आरोपीस ताब्यात घेतल्यास अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
किसन जाधव : वाहतूक पोलीस जमादार
बदनापूर शहरातील एका गॅरेज जवळ दोन मोटारसायकली आढळून आल्या असून त्या दोन्ही वाहनावर एकच नंबर असल्याने पोलीस ठाण्यात आणून लावले असून मुख्य सूत्रधार कोण आहे व त्याचा उद्देश काय होता यासाठी शोध सुरु आहे.









