बदनापूर, दि. 29 (प्रतिनिधी): निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टतर्फे तालुक्यातील दावलवाडी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 194 रूग्णांची तपासणी करण्यात येऊन 21 रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तारखा देण्यात आल्या.
बदनापूर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन तेथे नेत्र शिबिराचे आयोजन करून तेथील नेत्र रूग्णांना नेत्ररुपी संजीवनी देण्याचे काम संस्थेतर्फे सुरू असून संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या पुढाकाराने हा दृष्टीदान यज्ञ सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील दावलवाडी येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या उदघाटनासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत जगताप, सरपंच बबनराव जाधव, उपसरपंच सुभाष जगताप, साईनाथ जाधव, उत्तम पवार, बळीराम शिंदे आदींची उपस्थिती होती. या वेळी बोलताना वसंत जगताप यांनी डॉ. देवेश पाथ्रीकर करत असलेल्या आरोग्यसंवर्धन उपक्रमाचे स्वागत करून या समाजोपयोगी उपक्रमासाठी सदैव पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी हा उपक्रम राजकारणविरहित राबवण्यात येत असून आम्ही प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी असलेल्या नेत्र रूग्णांवर मोफत तपासणी करून त्यांना औषधी, गोळयांचे वाटप करून अत्यल्प दरात चष्म्यांचे वाटप करतो. तसेच ज्या रूग्णांना मोतीबिंदूचे निदान झालेले आहे त्या रूग्णांला चिकलठाणा लॉयन्स नेत्र रूग्णालयाच्या सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते, त्या साठी गावापासून त्यांना जाण्या-येण्याच्या सोयीबरोबरच खान-पान आदी सर्व सोयी संस्थेच्या वतीने करण्यात येतात असे प्रतिपादन करून हे बदनापूर तालुक्यातील आरोग्य संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला तसेच हा उपक्रम सुरूच राहणार असून त्यात आणखी वाढ करण्यात येईल असे सांगितले. या प्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने डॉ. पाथ्रीकर यांचा ते करत असलेल्या आरोग्यसंवर्धन कार्याबददल गौरव केला. या गावात करण्यात आलेल्या तपासणीत 194 रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधी, ड्रॉफटचे वाटप करण्यात आले तर 21 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तारखा देण्यात आल्या आहे.









