बदनापूर
बँकेतून काढलेले पैसे कारमध्ये ठेवून शेतात गेलेल्या शेतकऱ्याची कार फोडून १० लाख रुपये पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बदनापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे थेट आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.धोपटेश्वर शिवारातील घटनापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू कुंडलीकराव कोल्हे (वय ४९, रा. धोपटेश्वर, ता. बदनापूर) यांनी ४ सप्टेंबर रोजी बदनापूर शहरातील एसबीआय (SBI) बँकेतून १० लाख रुपयांची रोकड काढली होती. ही रक्कम कारमध्ये ठेवून ते धोपटेश्वर ते देवगाव रस्त्यावरील आपल्या शेतात गेले होते. हीच संधी साधून दुचाकीवरून पाळत ठेवणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी कारच्या मागील दरवाजाची काच फोडून आतील १० लाख रुपये लंपास केले. कोल्हे यांनी तातडीने बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.CCTV आणि तांत्रिक तपासाने लावला छडागुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी तपासाची चक्रे फिरवली. दोन विशेष पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक बाबींचे विश्लेषण करण्यात आले. यात दोन संशयित दुचाकीवरून कारचा पाठलाग करत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात हे आरोपी आंध्र प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले.आंध्र प्रदेशातून मुद्देमाल जप्त; आरोपींचा शोध सुरूनिष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये गुंजी चालराजु जबराज आणि गुड्डेटी विनोत प्रभुदास (दोन्ही रा. कपरला टिपा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश) यांचा समावेश आहे.
बदनापूर पोलिसांचे पथक आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तातडीने आंध्र प्रदेशात रवाना झाले. पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता, चोरीला गेलेल्या रकमेतील ६ लाख रुपये जप्त करण्यात यश आले. फरार आरोपी आणि उर्वरित ४ लाख रुपयांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.यांनी केली कारवाईसदर धडक कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस
अधीक्षक विक्रम साळी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूरचे पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक एस. आर. कुकलारे, पोलीस अंमलदार ए.एस. दासर, भडंगे, पी. के. गोलवाल आणि एस. जे. तडवी यांच्या पथकाने केली आहे.








