बदनापूर
तालुक्यातील मौजे ढासला येथे गुरुवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सरपंच राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वयं-सर्वेक्षण (सेल्फ सर्वे) केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन करून 224 घरकुलांना मंजुरी देण्यात आली.ग्रामसेवक संघटनेने ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्यामुळे ग्रामसभेचे सचिव म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुबेर मॅडम यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वयं-सर्वेक्षण केलेल्या लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेसमोर वाचून दाखविण्यात आली. यातील पात्र लाभार्थ्यांना ग्रामसभेने पात्र ठरविले. दरम्यान, स्वयं-सर्वेक्षण करूनही जवळपास 80 लाभार्थी तसेच सर्वेक्षणापासून वंचित राहिलेले सुमारे 150 लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे.ग्रामविकास विभागाच्या 12 ऑगस्ट रोजीच्या सूचनेनुसार नियमाप्रमाणे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून जवळपास 400 लाभार्थ्यांचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राम पाटील यांनी ग्रामसभेत दिली. तसेच 224 घरकुलांच्या मंजुरीसाठी ग्रामविकास अधिकारी आर. बी. बोकन यांनी विशेष मेहनत घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.शेतरस्त्यांचा प्रश्न ऐरणीवरग्रामसभेत गावातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नवतरुण शेतकऱ्यांनी शेतरस्त्यांच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त करत रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यावर सरपंच राम पाटील यांनी मुख्यमंत्री बळीराजा बांध रस्ते योजनेअंतर्गत गावातील जवळपास 17 शेतरस्त्यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली. लवकरच भूमी अभिलेख कार्यालयामार्फत रस्त्यांची मोजणी करून पुढील मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शाळेच्या विविध प्रश्नांवर चर्चाग्रामसभेत जिल्हा परिषद शाळेच्या विकासकामांबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शालेय व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय भालेराव यांनी शाळेला वॉल कंपाऊंड करण्यासंदर्भात ठराव मांडला.तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी तीन वर्गखोल्या पाडण्याची परवानगी प्राप्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याची मागणी केली. विलास पटेकर यांनी शाळेच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांची दखल घेऊन संबंधित विषयांवर तातडीने ग्रामसभेचे ठराव घेऊन जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात येईल आणि आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सरपंच राम पाटील यांनी दिली.या विशेष ग्रामसभेला उपसरपंच विजय पट्टेकर, ग्रामपंचायत सदस्य अण्णा कदम, कैलास पाचे, शेख कादिर, मदन डोभाळ, कौशल्याबाई गाडगीळे, बनोबी शेख जाहीर, अल्प चरण डोभाळ, सीमा शेडगे, माजी सरपंच उस्मान पठाण, ज्येष्ठ नागरिक जिजा कदमसाहेब, ऑपरेटर भारत पट्टेकर, असेफ शेख, शिपाई हारी खरात यांच्यासह नवतरुण युवक मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








