जालना । प्रतिनिधी – भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या 13 ते 15 ऑगस्ट 22 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्य सरकारने शासन मान्य जाहिरात यादीत सामाविष्ट असलेल्या सर्व वृत्तपत्रांना तसेच यादीत समावेश नसलेल्या मागणी करणार्या वृत्तपत्रांना या उपक्रमाची जाहीरात देण्यात यावी अशी मागणी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र (पीसीएम)चे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती व जनसंपर्क संचालनालय यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. यावर माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त शासन मान्य जाहिरात यादीवरील वृत्तपत्रांना आर्टपुल जाहिरात देण्यात आली आहे. पीसीएमच्या मागणीला यश आले असून जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहे.
हर घर तिरंगा या मोहिमेतंर्गत दिलेली जाहिरात ही 9 ऑगस्ट रोजी दैनिकांनी प्रकाशित करावयाची असून साप्ताहिकांसाठी या जाहिरातीसाठी दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असा कालावधी देण्यात आलेला आहे. शासनाकडून जाहिरात मिळाल्याचे कळताच प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांचे वृत्तपत्र क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.








