बदनापूर / आदिल खान
बदनापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलिस स्टेशन समोर, शिवराज कॉर्नर जवळ अशा विविध ठिकाणी झेंडूच्या फुलांच्या विक्री साठी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत
दिवाळी निमित्त झेंडू फुलांना मागणी वाढली आहे, मात्र अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे. परिणामी, झेंडूच्या फुलांचे दर गेल्या काही दिवसांपासून चढेच असून, किरकोळ बाजारात किमान ४० ते ७० रुपये किलो दराने विक्री होते आहे.
दिवाळी सण व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्या सणाला झेंड़ूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. पूजेसह घराला तोरण बांधणे, सजावट, वाहनांना; तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. त्यामुळे मागणी लक्षात घेता, विक्रीतून चांगली कमाई होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली, परंतु अतिवृष्टीमुळे फुलांचेही मोठे नुकसान झाले आहे.
बाजारात सध्या ४० ते ७० रुपये प्रती किलो दराने झेंडू फुलांची विक्री होत आहे. बाजारात सोमवारी तालुक्यातील स्थानिक शेतकरी; तसेच फुल विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात फुले विक्रीसाठी आणली आहेत








