बदनापूर (प्रतिनिधी) :
दाभाडी (ता. बदनापूर) येथे मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या एका विवाहित महिलेवर गावातील पाच जणांनी बलात्कार केल्या प्रकरणी बुधवारी (ता. सात) रात्री उशिरा बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत दाभाडी येथील त्या महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीत म्हणटले आहे की, त्यांची 40 वर्षीय पत्नी मानसिकदृष्ट्या दिव्यांग आहे. त्याचा फायदा उचलत गावातील संशयित संदीप कोल्हे, सुंदरराव कोल्हे, दत्तू खमाटे, बाबासाहेब कोल्हे व लक्ष्मण सोरमारे यांनी संगनमत करून त्यांच्या पत्नीवर दर्ग्यासमोरील ढाब्यामध्ये आणि तेथील लिंबाच्या झाडाखाली 28 जुलै ते 29 जुलैच्या दरम्यान सामूहिक बलात्कार केला.
या घटनेची तक्रार प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांनी घटनास्थळाला तातडीने भेट घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अधिक तपास जालना येथील पिंक पथक प्रमुख तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक निशा बनसोड आणि बदनापूरच्या फौजदार पूजा पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. एकूणच या घटनेमुळे अवघ्या दाभाडी गावांत संशयित आरोपितांविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणाचा कसून तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









