श्रीकृष्ण पवार
मंठा:- महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील प्रतोद, तथा सभापती-तालिका,आमदार राजेशजी राठोड यांना मागील ३-४ दिवसांपासून मोबाईल फोनवरून तसेच व्हाट्सअप्प ग्रुप वरिल चॅटच्या माध्यमातून धमक्या देण्यात येत आहेत. ‘राजपूत भामटा’ या प्रवर्गातील ‘भामटा’ हा शब्द वगळून टाकल्यास ‘राजपूत भामटा’ समाजासह बंजारा तसेच संपूर्ण VJNT समाजाच्या आरक्षणावर गदा येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने असा प्रयत्न करू नये, या विषयावर आमदार राजेश राठोड गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. याच संदर्भात ही धमकी आल्याची माहिती मंठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक खेडेकर यांनी दिली आहे. आ.राजेश राठोड यांचे सहाय्यक श्री राजेश चव्हाण आणि अंगरक्षक श्री परमेश्वर ढगे यांच्या फिर्यादीवरून फोनद्वारे तसेच व्हाट्सअप्प चॅटद्वारे धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून विविध समाजकंटकाकडून आ. राजेशजी राठोड यांना वारंवार येणाऱ्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवितास काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी हि राज्य शासनाची असल्यामुळे त्यांना उच्चस्तरीय संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सदर तक्रार अर्जाद्वारे मंठा पोलीस स्टेशनला आणि जालना पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आलेली आहे.









