बदनापूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार तथा आमदार नारायण कुचे यांच्या वतीने आज दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, सर्व विरोधक एकत्रित येऊन भाजपला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र भाजप हा संघर्षातून पुढे आलेला पक्ष आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विकास कामांचा एजेंडाच या निवडणुकीत सामान्य जनतेसमोर मांडणार आहोत, असे स्पष्ट करीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून आमदार नारायण कुचे यांना विजयी करावे, असे आवाहन केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी विकास साधण्याची धमक केवळ महायुतीच्या सरकारमध्ये आहे. माजी मंत्री राजेश टोपे यांनी पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याचा किती विकास साधला ते सांगावे, अशी टीका केली.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, शिवाजीराव थोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास मदन, वसंतराव जगताप, गोरखनाथ खैरे, पद्माकर जऱ्हाड, देविदास कूचे, शिवसेनेचे ईश्वर जुंबड, निवृत्ती डाके, भगवान ढाकणे, महादू गीते, गणपत केकान आदींसह महायुतीतील घटक पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमानंतर चिखली जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश डोळस यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह श्री. दानवे आणि कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला.









